बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर.
बंगालच्या उपसागरात तामिळनाडूजवळ आणि अरबी समुद्रात केरळजवळ कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन कधी?
हवामान अंदाजानुसार, २३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकल्यास त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येईल.
२३ नोव्हेंबरपासून: दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणास सुरुवात होईल.
२४ नोव्हेंबरपासून: राज्यात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत पावसाचा अंदाज आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत: पावसाचा प्रभाव वाढून तो मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतो.
डॉ. बांगर यांनी स्पष्ट केले आहे की, हा पुढील आठवड्याचा अंदाज असून, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या मॉडेलनुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेती कामांचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.