मुख्य प्रभाव छत्तीसगड, तेलंगणावर; महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, सांगली, सोलापूरमध्ये केवळ हलक्या सरींची शक्यता.
पुणे: राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच, हवामान अभ्यासकांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या प्रणालीमुळे राज्यात मोठ्या पावसाचा धोका नसला तरी, काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ परिणाम दिसू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
राज्याच्या सीमावर्ती भागांवर किरकोळ परिणाम
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार होणारे हे कमी दाबाचे क्षेत्र प्रामुख्याने छत्तीसगड आणि तेलंगणाच्या दिशेने सरकेल. त्यामुळे त्याचा मुख्य जोर याच राज्यांवर राहील. महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह तुलनेने खूप कमी पोहोचणार असल्याने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही. या प्रणालीचा किरकोळ प्रभाव राज्याच्या दक्षिण-पूर्व भागांवर जाणवेल. विशेषतः नांदेड, लातूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी किंवा तुषार स्वरूपाचा वर्षाव होऊ शकतो.
















