लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेबद्दल एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील अनेक भगिनींना eKYC करताना एक मोठी अडचण येत होती. ज्या महिलांना पती नाहीये (विधवा किंवा घटस्फोटीत आहेत) किंवा ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यांना eKYC पूर्ण करण्यासाठी योग्य आधार कार्ड कोणाचे वापरावे, असा प्रश्न पडला होता. या संभ्रमामुळे अनेक जण घाईगडबडीत नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून eKYC करत होते, पण आता सरकारने या समस्येवर अधिकृत तोडगा काढला आहे. ज्यांनी अद्याप eKYC केलेली नाही, त्यांनी नवीन नियमांची वाट पाहणे योग्य ठरणार आहे.
राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, एकल महिलांसाठी eKYC प्रक्रिया सोपी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच एक नवीन पर्याय (Option) जोडण्यात येणार आहे. वेबसाईटमध्ये हे बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा बदल विशेषतः अशा महिलांसाठी तयार करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांची eKYC प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही. सध्या, दररोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचे eKYC पूर्ण होत आहे, आणि एक कोटींहून अधिक महिलांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे.
















