महाडीबीटीमधील अर्ज आता थेट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवर (NDKSP २.०)
महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर (MahaDBT Farmer Scheme) अर्ज भरताना गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या समस्या आणि वारंवारचे मेंटेनन्स यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नावर आता कृषी विभागाने मोठा तोडगा काढला आहे. राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (PoCRA २.०) टप्पा दोन अंतर्गत निवड झालेल्या ७२०१ हून अधिक गावांमधील शेतकऱ्यांचे अर्ज आता एनडीकेएसपीच्या (NDKSP) नवीन पोर्टलवर स्थलांतरित (Migration/Redirect) केले जात आहेत.
स्थलांतरणाची प्रक्रिया आणि अर्जदारांसाठी नियम
महाडीबीटी पोर्टलवर अनेक दिवसांपासून अंडर मेंटेनन्सची समस्या येत होती, कारण याच कामामुळे पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. या स्थलांतरणामध्ये ठिबक सिंचन (Drip Irrigation), तुषार सिंचन आणि पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या इतर बाबींचे अर्ज समाविष्ट आहेत. विशेषतः, हे अर्ज अशाच शेतकऱ्यांचे स्थलांतरित होत आहेत, ज्यांचे अर्ज अद्यापपर्यंत मंजूर झालेले नाहीत किंवा ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही. ज्या अर्जदारांना आधीच पूर्वसंमती (Prior Approval) मिळालेली आहे, त्यांची पुढील प्रक्रिया मात्र महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे. स्थलांतरणामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन मर्यादा पाच हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज एनडीकेएसपी २.० च्या पोर्टलवर रिडायरेक्ट करण्यात आले आहेत.
















