विस्तारा सोयाबीन वाणाने जालन्यात घातला धुमाकूळ, 5600 ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव.
‘विस्तारा’ वाणाने घातला धुमाकूळ ; जालना बाजार समितीत सोयाबीनला चांगला भाव ; जालना बाजार समितीत मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीनच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. विशेषतः ‘विस्तारा’ (Vistara) या नव्या वाणाच्या सोयाबीनने बाजारात मोठी धुमाकूळ घातली असून, त्याला नियमित सोयाबीनच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त दर मिळाला आहे. वाबळे ट्रेडिंग कंपनीसारख्या अडत्यांनी ‘विस्तारा’ सोयाबीनचा एक मोठा लॉट तब्बल ६,१११ रुपये प्रति क्विंटल दराने विकला.
सामान्यपणे ‘जेएस ३३५’, ‘ग्रीन गोल्ड’ आणि ‘फुले दुर्वा’ सारख्या वाणांना ४,४०० ते ४,९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत असताना, ‘विस्तारा’चा दर ५,७०० रुपयांपासून ते ६,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारात या वाणाला अधिक भाव मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या त्याची खरेदी बियाण्यासाठी (Seed) केली जात आहे, अशी माहिती अडत दुकानदारांनी दिली.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बोडखा (ता. घनसांगवी) येथील शेतकरी वसंत ढेरे यांनी सोयाबीन उत्पादनावर आपला अनुभव मांडताना सध्य परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ढेरे यांच्या माहितीनुसार, सोयाबीनच्या एका एकरासाठी बाजारात माल आणेपर्यंत २५,००० ते ३०,००० रुपये खर्च येतो आणि उत्पादन सरासरी ८ ते ९ क्विंटल मिळते. सध्याच्या ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन पीक परवडत नाही. खत आणि औषधांचे दर दुप्पट झाले असताना, केवळ लावलेला खर्चच वसूल होतो किंवा तोही निघत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी किमान पाच वर्षांसाठी शेती पडीक ठेवावी आणि केवळ स्वतःच्या गरजेपुरती शेती करावी, असा टोकाचा आणि महत्त्वपूर्ण सल्ला दिला. तसेच, सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि हमी भावाने (MSP) सोयाबीनची खरेदी करावी, अशी तीव्र मागणी त्यांनी केली आहे. सोयाबीनसारख्या पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नसल्यामुळे आज जगाचा पोशिंदा उपाशी मरून राहिला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.