रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; नोव्हेंबरच्या शेवटी खरच पाऊस आहे का? रामचंद्र साबळे.
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. बुधवार, १९ नोव्हेंबर ते शनिवार, २२ नोव्हेंबर या चार दिवसांत महाराष्ट्रात हवेचा दाब वाढणार आहे, ज्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होऊन थंडीची तीव्रता वाढेल. ईशान्येकडून थंड वारे वाहत राहतील.
या थंडीचा अधिक प्रभाव उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात राहील, तर कोकणात थंडीचे प्रमाण कमी असेल. किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास पिके आणि जनावरांवर विशेष परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीचे पहिले दोन आठवडे कडाक्याच्या थंडीचे असतील आणि काही ठिकाणी तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंतही घसरू शकते. तसेच, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सकाळी धुके जाणवेल.
सध्या तरी पावसाची शक्यता नाही, मात्र सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्यानंतर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान लहान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काही भागांत अल्पसा पाऊस होऊ शकतो, परंतु सध्या तरी गारपीट होण्याची शक्यता कमी आहे.
तापमान ८ अंश सेल्सिअस किंवा त्याहून खाली आल्यास स्वतःची, जनावरांची, कुकुटपालनाची आणि फळबागांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ढगाळ हवामान राहिल्यास कीड आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. गव्हाची पेरणी राहिली असल्यास लवकरात लवकर उरकून घ्यावी, कारण उशिरा पेरणी केल्यास (१५ डिसेंबरपर्यंत) उत्पादन घटते. उशिरा पेरणीसाठी एचडी ३२७१, पीबीडब्ल ७५७, पीबीडब्ल ७७१ यांसारख्या शिफारस केलेल्या जातींचा वापर करावा.
कृषी सल्ल्यानुसार, भुईमूग आणि तूर पिकाची पेरणी आता करू नये. उगवण व वाढ चांगली होण्यासाठी उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीनंतर करावी. मका पेरणी आता केली तरी चालेल, परंतु उगवण उशिरा होईल. पाण्याची सोय असल्यास कपासाची फरदळ (दुसरे पीक) जरूर करावी.
कोरडवाहू रबी ज्वारीसाठी दोन कोळपण्या आणि तण नियंत्रणावर लक्ष देणे आवश्यक आहे. शक्य असल्यास पीक पोटरीत असताना आणि फुलोऱ्यात असताना पाणी द्यावे, जेणेकरून पिकाला चांगला फायदा होईल.