राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी ; कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.
राज्यातील हवामान सध्या पावसासाठी पोषक बनले असल्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात थंडी कमी राहू शकते. काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.
कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
आजचा अंदाज हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
रविवारचा अंदाज: उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
सोमवारचा अंदाज: सोमवारी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस होऊ शकतो.
किमान तापमानात वाढ
राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये धुळे येथे ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२ अंशांची नोंद झाली. धुळे वगळता राज्यातील इतर भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.