मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील…
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात होते. यावर ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे.
महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने ही योजना बंद करणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते. या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्याची आणि लाभ घेतल्याचे समोर आले होते. यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली होती. यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. तो आता येत्या १७ नोव्हेंबरला संपत आहे.
ईकेवायसी करण्याची अखेरची तारीख जरी जवळ आली असली तरी ऑक्टोबरमध्ये राज्याच्या मंत्री आदित तटकरे यांनी याची मुदत १५ दिवसांसाठी वाढविणार असल्याचे म्हटले होते. राज्यात आलेल्या पुराच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. या मुदतवाढीमुळे ज्या महिला अद्याप ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत, त्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.